उत्तर भारतातील बर्याच लोकांना क्रिमिका बिस्किट आणि इंग्लिश ओव्हन बेकरीबद्दल सांगायची गरज नाही. आपल्या घराच्या अंगणात सुरु केलेल्या एका आईस्क्रीम शॉपचे रुपांतर भारतातील बहुचर्चित बेकरी ब्रॅण्डमध्ये करणारी स्त्री म्हणजे श्रीमती रजनी बेक्टर्स. पण यांच्याबद्दल मात्र अनेकांना माहिती नाही.
मिसेस बेक्टर्स फूड स्पेशलिटीजच्या IPOला १ डिसेंबर २०२० रोजी, १९८ पट सब्सक्रिप्शन मिळाले. त्याची किंमत ५४० करोड इतकी होती. फक्त बिस्किटच नव्हे तर बर्गर किंग आणि मॅकडोनाल्ड्स सारख्या फास्टफूड चेनसाठी देखील मिसेस बेक्टर्स फूड स्पेशलिटीज बन्स सप्प्लाय करतात. आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली ती लुधियानाच्या एका लहान स्वयंपाकघरातून.
पण श्रीमती बेक्टर ह्या आहेत कोण ?
रजनी बैक्टर यांचा जन्म कराची येथे झाला. भारत फाळणी काळात त्या पंजाबमधील लुधियाना येथे आल्या. त्या शहरात मोठ्या झाल्या आणि वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. तीन मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवल्यानंतर, त्यांनी पंजाब कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला.
त्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट कूक आणि बेकर होत्या. त्यांनी बनवलेल्या आईसक्रीम आणि केकच्या पाककृती लवकरच त्यांच्या मित्र आणि सहकारी परिवारात लोकप्रिय झाल्या. आणि त्या सर्वानीच बेक्टर्स यांना ओव्हनसाठी 300 रुपये घेण्यास प्रोत्साहित केले. 300 रुपयांच्या ओव्हन आणि आईस्क्रीमसह, त्यांनी घरामागील अंगणात बेकरी सुरू केली. १९७८ मध्ये त्यांच्या अंगणातील बेकरीने लोकांचे जबरदस्त लक्ष वेधण्यास सुरुवात केली. तेव्हा बेक्टर्स यांच्या कुटुंबियानी त्यांना मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी २०,००० रुपये कर्ज दिले. आणि अशा प्रकारे त्यांचा प्रथम एक बिस्किट ब्रँड सुरू झाला.
श्रीमती बेक्टर्स यांनी ‘क्रीम का’ या हिंदी शब्दावरून ‘क्रीमिका’ हे नाव निवडले. याचा अर्थ क्रीम पासून बनवलेले.
घरामागील अंगण पासून मोठे साम्राज्य
९०च्या दशकात भारतीय खुली अर्थव्यवस्था अंमलात आली. हा खूप मोठा बदल होता, ज्याने क्रिमिकाला आणखी वाढण्यास मदत केली. आणि मिसेस बेक्टर्स या छोट्या बेकरीची ओळख देशभरात होण्याचा मार्ग मोकळा झाला. या दशकात कंपनीने बन, बिस्किट, ब्रेड आणि सॉस तयार करण्यास सुरवात केली होती.
फास्ट-फूड चेन मॅकडोनल्ड्सला बन्स पुरवठा करण्याचा करार १९९५ मध्ये केला. तो एक बेक्टर्स यांच्यासाठी एक यशाचा महत्वपूर्ण टप्पा होता. भारतातील फास्ट-फूड चेनच्या आक्रमक विस्तारामुळे बेक्टर्स यांची “क्रीमिका” वाढण्यास देखील मदत झाली.
२००६ मध्ये, मिसेस बेक्टर्स यांच्या क्रीमिकाने 100 कोटी रुपये कमावले. २०११-१२ पर्यंत त्यांची वार्षिक विक्री ६५० कोटी रुपये होती. आज हि लुधियानाची कंपनी भारतीय रेल्वेबरोबरच बर्गर किंग, पिझ्झा हट, पापा जॉन यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसाठी ब्रेड, पिझ्झाबेस, सॉस आणि इतर वस्तूंचा पुरवठा करत आहे.
मिसेस बेक्टर्स फूड्सचे यश हे भारतातील असंख्य महिलांसाठी प्रेरणास्थान आहे, जे स्वत: चा खाद्य व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहतात. योग्य कौशल्ये आणि उत्कटतेने घराचे अंगणदेखील प्रारंभ करण्यासाठी सर्वोत्तम स्थान असू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.